निपाणी दलित संघटनांतर्फे निपाणीत मोर्चा : मुख्यमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची सोशल मीडियाच्या माध्यमातून विटंबना करण्यात आली आहे. आतापर्यंत समाजकंटकांनी अशा अनेक घटना घडविले आहेत. तरीही आंबेडकरांच्या अनुयायांनी संयमपणे आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून दोषींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ३०) येथील विविध दलित संघटनांतर्फे मोर्चा काढून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
असंख्य दलित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जत्राट वेस येथून मोर्चा काढण्यात आला. चिकोडी रोड, धर्मवीर संभाजीराजे सर्कल, जुना पी. बी. रोड, नगरपालिकामार्गे तहसीलदार कार्यालयात गेला.
दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे यांनी, डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत गैरकृत्य करून जातीधर्मांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार काही शक्ती करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सायबर पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. हा अपमान केवळ दलित समाजाचा नसून समस्त नागरिकांचा आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा दलित कार्यकर्ते गप्प बसणार नसल्याचे सांगितले.
यावेळी अशोककुमार असोदे व मान्यवरांच्या हस्ते तहसीलदारांमार्फत जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी, समाजकल्याण मंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.
निवेदना मधील माहिती अशी, राज्यात महापुरुषांच्या संबंधित वारंवार मनुवादी मानसिकता असणाऱ्या असामाजिक घटकांच्यातर्फे विटंबना होत आहे. काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर आपल्याच राज्यात पैगंबर साहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला. आता इन्स्टाग्राम ह्या सोशल मिडीयाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र वापरून विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. तरी बहुजन समाज असे कृत्य कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांना धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली.
उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे व मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी जीवन घस्ते, लोकेश घस्ते मोहन घस्ते, अविनाश माने, आकाश माने, आरेश सनदी, संभाजी मुगळे, विश्वास माळी, प्रतीक कांबळे, सुरज कांबळे, सुशांत कांबळे, शिवम कांबळे, अरबाज कांबळे, श्री कांबळे, शंकर कांबळे, राहुल कांबळे, अक्षय ताते, सुखदिर कांबळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta