अनिल स्वामी : ‘वीरशैव’च्या निपाणी शाखेला भेट
निपाणी (वार्ता) : कोरोनामुळे गेले दोन वर्षे सर्वसामान्य नागरिक व्यवसायिक आणि बँकांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या जनजीवन पूर्ववत होत आहे. तरीही भारतीय रिझर्व बँकेच्या बंधनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँका चालवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत काटकसर करून सर्वसामान्यांच्या हितासाठी पत पुरवठा करणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल स्वामी यांनी व्यक्त केले. येथील शाखेला दिलेल्या भेटी प्रसंगी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संचालक सूर्यकांत पाटील -बुदिहाळकर यांनी, कोणत्याही संस्थेमध्ये गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. त्यातूनच व्यावसायिक व शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा होत असतो. त्यामुळे कर्जदारांनी घेतलेले कर्ज वेळेत परतफेड केल्यास स्वतःसह संस्थेची प्रगती होत असते. संस्थेतर्फे पारदर्शी कारभार सुरू असून दर्जेदार सेवा दिल्या जात असल्याचे सांगितले.
चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी, निपाणी शाखेसाठी सल्लागार नेमणुकीसह विविध प्रकारच्या सूचना केल्या.
माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पवार यांनी, वीरशैव बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू नागरिकासह दलित वर्गाला पद पुरवठा करून मोठा दिलासा दिला आहे. अनेक मागासवर्गीय समाजातील नागरिक उद्योग, व्यवसाय करत आहेत. यापुढील काळात सबसिडीच्या योजना राबविल्यास त्याचा सर्वसामान्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ संचालक नानासाहेब नस्टे यांनी, सहकार क्षेत्रामध्ये वीरशैव संस्थेने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेकडे ५ कोटी ३८ लाखाच्या ठेवी असून कर्जही मोठ्या प्रमाणात दिले आहे. या पुढील काळात ठेवी वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर -पवार, राजू पोवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे नूतन चेअरमन अनिल स्वामी यांचा सत्कार झाला.
यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक सुकुमार पाटील-बुदिहाळकर, प्रताप मेत्राणी, सचिन गायकवाड, दर्शन शास्त्री, अजय शास्त्री, शैलेश शहा, अभिजीत पाटील, प्रकाश पाटील, शिवानंद पाटील, शिवप्रसाद मठपती, दत्ता लाटकर, मृगेश कल्याणशेट्टी, शाखाधिकारी बी. एस. पर्वते, नगरसेवक दिगंबर कांबळे, महावीर पाटील, महापाली ढाले, नवीन निर्मळे, बबन जामदार, रोहन पाटील यांच्यासह संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta