निपाणीतील पहिली विद्यार्थिनी : सरकारी कोट्यातून निवड
निपाणी (वार्ता) : येथील उमेश मेहता यांची कन्या डॉ. निधी मेहता यांची वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाकरिता नवी दिल्ली येथील ख्यातनाम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) वैद्यकीय शिक्षण संकुलातील डर्मोटोलॉजी (त्वचा विकार शास्त्र) या विद्याशाखेमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळविला आहे. हा प्रवेश मिळवणारी निपाणीतील ती पहिली विद्यार्थिनी आहे.
डॉ. निधी मेहता यांनी सन २०२२ साली किम्स् हुबळी विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दिल्ली एम्स येथे प्रवेश मिळविण्यासाठी लक्ष्य केंद्रित केले होते. एम्स च्या आयएनआय सीईटी या स्पर्धा परीक्षेत देशभरातील सुमारे दीड लाख उमेदवारांनी परीक्षा दिली त्यामध्ये डॉ. निधी मेहता यांनी११० वा क्रमांक प्राप्त करून एम्स मध्ये प्रवेशाचे आपले ध्येय साध्य केले.
दिल्ली एम्स मध्ये प्रवेश मिळविणाऱ्या डॉ. निधी या निपाणी तालुक्यातील एकमेव विद्यार्थीनी ठरल्या आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील सीबीएसई स्कूलमध्ये झाले. त्यानंतर धारवाड येथील हंचीनमनी महाविद्यालयात त्यांचे अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. अभ्यासा मध्ये सातत्य आणि जिद्द चिकाटी ठेवून त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता त्यांची सरकारी कोट्यातून त्वचारोग शास्त्र शाखेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta