पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पाटील मळ्या नजीक उड्डाणपूल तयार करून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयावर हणबरवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
यावेळी बोलताना बाळासाहेब कागले म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व ग्रामस्थांना राष्ट्रीय महामार्गावरून जाताना अडचण निर्माण होणार आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी उड्डाणपूल निर्मिती करून द्यावी व ग्रामस्थांची सोय करून द्यावी अशी मागणी केली. मागणी न मान्य केल्यास रस्ता काम बंद पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धनाजी कागले म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी असल्याने उपलब्ध होऊ शकले नाहीत. यासाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याशी संपर्क साधून सदर पुलाची मागणी केली. यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांनी दुपारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
हणबरवाडी गावातील विद्यार्थी व नागरिकांच्यासाठी कोणताही पक्षपात न करता सर्वजण एकत्र येऊन हा लढा दिला जाणार असल्याचे ग्राम पंचायत सदस्य कृष्णात खोत यांनी सांगितले.
यावेळी सुनील घुगरे, सरदार पोवाडे, विजय खोत, भीमराव खोत, मुरलीधर कोळेकर, तात्यासाहेब खोत, दीपक कदम, महादेव खोत यांच्यासह हणबरवाडी येथील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta