खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश
निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. याबाबत हरीश खंडेलवाल यांनी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणी- इचलकरंजी रस्त्यावर खंडेलवाल यांचा बायो केमिकल खत कारखाना असून त्या शेजारीच स्नेहा खंडेलवाल यांचे हरबल लिक्विड कारखाना आहे. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने या कारखान्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच खंडेलवाल यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार सदलगा, टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना जवाहर साखर कारखाना येथील अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले नाही.
या आगीत दोन कोटीचे खत, नवीन आयशर वाहन, प्लास्टिकचे कॅन व इतर हर्बल बायो प्रोडक्ट एकूण पाच कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बोरगाव परिसरात अशा मोठ्या आगीची ही पहिलीच घटना आहे. आगीची घटना समजतात परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत हरीश खंडेलवाल यांनी तक्रार दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta