वाळकीतील घटना : तालुका पंचायत अधिकाऱ्याकडून चौकशी
निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांच्या घरासमोर फोटो काढून जीपीएस करून घरकुलाची रक्कम हडप केल्याची घटना २०१०-११ साली वाळकी ग्रामपंचायतमध्ये घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी सलग पाच वर्षे शासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पंचायतराज विभागाचे सहाय्यक अधिकारी एस. एस. मठद यांनी मंगळवारी (ता.३१) दुपारी वाळकी गावाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर संबंधित अहवाल प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत मठद यांनी दिलेली अधिक माहिती अशी, सन २०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये घरकुल योजनेमध्ये बनापा तुकाराम टाकळे यांच्या घरासमोर छायाचित्र काढून घेऊन प्रिया प्रकाश पाटील यांनी सदर शासकीय घरकुलाची ७५ हजार रुपयाची रक्कम चार टप्प्यांमध्ये हडप केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुसार ही चौकशी करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्ष के. जी. पाटील आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तालुका पंचायतराज विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना घेऊन टाकळे यांच्या घरासमोर प्रिया पाटील यांचे छायाचित्र काढून जीपीएस केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने चार हप्त्यांमध्ये ही रक्कम पाटील यांनी घेतली आहे. याबाबत ग्रामस्थांनी चौकशीसाठी सर्व अधिकाऱ्यासह लोकायुक्तांना निवेदन दिले आहे. पण शासकीय अधिकारी राजकीय दबावामुळे या प्रकरणाची चौकशी करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय अधिकाऱ्यांचेही यामध्ये संगणमत असल्याचे म्हटले आहे. अशाच प्रकारे गावांमध्ये तीन ते चार घराबाबत रक्कम हडप झाली असून त्याबाबत आपण चौकशीसाठी निवेदन दिल्याचे बिरू मुधाळे यांनी सांगितले.
घराचे रक्कम हडप करण्यासह गावातील विविध रस्ते आणि इतर कामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून लाभार्थीसह ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत नागरिकांनी केली आहे.
यावेळी खंडेराव पाटील, सुजय पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अनिल नाईक, महादेव पाटील, सुकुमार गोमाई, मारुती पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल ढोणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta