Share
दर्शनासाठी भाविकांची गर्दी : पुण्याच्या कलाकाराकडून फुलांची आकर्षक सजावट
निपाणी (वार्ता) : शहरासहसह परिसरातील शिवमंदिरात शनिवारी महाशिवरात्री विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शिवमंदिरांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येथील महादेव गल्लीतील शतकोत्तर परंपरा असलेल्या महादेव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केल्याने मंदिर परिसर उजळून गेला आहे. शनिवारी (ता.१८) पहाटे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार दांपत्यांचे हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवलिंगाची पूजा बांधण्यात आली. मंदिरात पुणे येथील कलाकारांकडून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शाबू, केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
याशिवाय मंगळवार पेठ, प्रगती नगरातील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अक्कोल रोडवरील सोमनाथ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिप्पूर येथील रामलिंग देवस्थान व आडी मल्लय्या डोगरावरील मल्लिकार्जुन मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी केली होती. दोन वर्षे कोरोनाचा संसर्ग असल्याने सर्वत्र महाशिवरात्री साधेपणाने साजरी केली होती. पण यावर्षी संसर्ग कमी झाल्याने महाशिवरात्री उत्साहाने साजरी करण्यात आली.
महादेव गल्लीतील महादेव मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळी महादेव उत्सव यात्रा कमिटीतर्फे चांदीच्या पालखीतून महादेवाची सवाद्य मिरवणूक काढली. यावेळी महादेव देवस्थान मंडळ, महाशिवरात्री रथोत्सव कमिटी, गणेश हेल्थ क्लब, गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह परिसरातील भाविकांची गर्दी केली होती.
—–
२१ ला रथोत्सव
मंगळवारी (ता. २१) रोजी महादेवाची रथोत्सव मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामध्ये केंपट्टी, बेडकिहाळ व जमखंडी येथील बैंड, याद्यानवाडी, करोशी, धुळगणवाडी व कोथळी येथील करडी ढोल, जमखंडी येथील संबळ वाद्य, हत्ती, घोड्यांचा समावेश आहे. शुक्रवारी (ता. २४) दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. शहर व परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन महादेव यात्रा कमिटीचे अध्यक्ष व माजी सभापती सुनील पाटील यांनी केलेआहे.
—-
विविध शर्यतींचे आयोजन
रविवारी (ता.१९) रोजी सकाळी ९ वाजता सायकल शर्यती होणार आहे. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे २१,०००, १५,००० आणि १०,०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सायंकाळी ४ वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे १५०००, ११००० ,७०००, ५ ००० आणि ३००० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत. रविवारी रात्री ८ वाजता गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ४ वाजता आयोजित जनरल घोडागाडी शर्यतीसाठी १५ हजार, १० हजार आणि ७ हजार रुपये, खुला नवतर घोडागाडी शर्यतीसाठी ७ हजार, ५ हजार ३ हजार रुपये आणि घोडा-बैलगाडी शर्यतीसाठी ३ हजार २ हजार व १ हजार रुपयांचे बक्षीसे देण्यात येणार आहेत.
Post Views:
551