हदनाळ शेतकऱ्यांचा प्रश्न : शेतीच्या पाण्यासाठी भटकंती
कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील कालव्याला गुरुवार तारीख 2 रोजी पाणी आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करून शेतकऱ्यांनी कालव्याला पाणी सोडण्यास भाग पाडले. यासाठी दैनिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता. या सर्वांची दखल घेत पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. पण सध्या कर्नाटक हेस्कॉम यांच्याकडून सोडला जाणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
हेस्कॉम वतीने दिवसा तीन तास व रात्री चार तास असा विद्युत पुरवठा करण्याचा नियम असून देखील वारंवार दुरुस्तीचे कारण पुढे करत विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे परिसरातील हाता तोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
विद्युत खंडित पुरवठा याबाबत अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता उडवा उडवी ची उत्तरे देण्यात येत आहेत. या कामी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय ताबडतोब थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
1980 साली विद्युत बोर्डाकडून हदनाळ गावासाठी विद्युत जोडणी करण्यात आली आहे. त्यावेळी घालण्यात आलेल्या विद्युत खांब व विद्युत तारा आता जीर्ण झाले असून यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तरी या विभागातील अधिकाऱ्यांनी ताबडतोब नवीन विद्युत तारा व
बदलून शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे.
——————————————————————
हदनाळ येथील शेती कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यामुळे या ठिकाणी होणारा वारंवार वीज खंडितपणा थांबवून सुरळीत वीजपुरवठा करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी शेतकरी शिवाजी पाटील, वसंत पाटील, नारायण पाटील, विश्वास पाटील, बाबासो पाटील यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– श्री. मधुकर पाटील शेतकरी हदनाळ, ता. निपाणी
—————————————————————–
कालव्याला महिन्यातून सात दिवस पाणी सोडले जाते. पाणी आलेल्या वेळेतच शेतीला पाणी देणे फार गरजेचे आहे. यासाठी विद्युत बोर्डाकडून वीज सुरळीत सोडण्यात यावी.
– श्री. दिलीप पाटील शेतकरी हादनाळ
Belgaum Varta Belgaum Varta