लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांचे हाल
कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील गावात समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गावाची लोकसंख्या सुमारे 4 हजार असून गाव अडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे. गेल्या वर्षभरापासून येथील गटारीतील कचरा स्वच्छता न केल्याने गटारी तुडुंब भरून रस्त्यावर घाण पाणी येऊ लागले आहे. गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी असलेली पाईपलाईन याच गटारीतून असल्याने गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून गावातील अनेक कामे करण्यात आली आहेत. पण ती अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हंचिनाळहून आडी, बेनाडी, सुळकुड जाण्यासाठी जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमधच विद्युत वाहक खांब बसवला आहे. यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर याच रस्त्यावर महेशानंद उर्फ ईश्वर स्वामी महाराज यांचा भक्ती योगा आश्रम आहे. या भक्तीयोग आश्रमाचे कंपाउंड बांधकाम रस्त्यालगतच झाले आहे. इथून पुढे जाणे व येणे करण्यासाठी पुढील वाहन येत असलेले दिसत नसल्याने या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गावांमध्ये गॅस्ट्रो सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून गावातील व गावासभोतातील स्वच्छता ताबडतोब करून घ्यावी अशी मागणीतील ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून बांधण्यात येत असलेल्या स्मशान शेडचे काम ही अद्याप अर्धवट आहे. यामुळे अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना त्रास होत आहे. गावामध्ये आठवड्यातून एकदा तरी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देणे गरजेचे असताना देखील ते फिरकत नसल्याची तक्रार केली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांची मीटिंग घेऊन समस्या सोडवणे क्रमप्राप्त असताना ग्राम पंचायतीच्या वतीने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची मीटिंग अथवा ग्रामस्थांना सूचना केली नाही. या सर्व गोष्टीचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करून घ्यावा लागत आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत आहे. मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यावरती घालण्यात आलेले सिमेंटचे पाईप रस्त्याच्या वरती येऊन खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन ताबडतोब कामे करून घ्यावीत व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करावे अशी मागणी येथील समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
——————————————————————-
गावातील गटारी ग्रामपंचायत कडून स्वच्छ करून घ्याव्यात गावामध्ये सध्या गॅस्ट्रो सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावात नागरिकांची जनजागृती करण्यात यावी, त्याचबरोबर औषधोपचार करावा.
– श्री. तायगोंडा पाटील, ग्रामस्थ हंचिनाळ
Belgaum Varta Belgaum Varta