महागाईचा भडका : व्यावसायिक सिलेंडर २१५१ रुपये
निपाणी (वार्ता) : घरगुती गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक बनला आहे. घरगुती गॅसचे दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गॅस ५० रुपयांनी महागला असून निपाणीत हा दर ११२० रुपये ५० पैशावर पोहोचला आहे. तर व्यावसायिक गॅस दरात तब्बल ३५० रुपयांनी वाढ होऊन तो आता १८०० रुपयावरून २१५१ रुपयावर पोहोचला आहे.
उज्ज्वला गॅस योजनेमुळे शहरांसोबतच ग्रामीण भागांतही सिलिंडरची मागणी वाढली आहे. मात्र गॅसचे दर दिवसागणिक वाढत असल्याने ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सिलिंडर लवकरच १५०० रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणीचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
——————————————————–
चूल पेटविता येईना, गँस परवडेना
गॅस कितीही महाग झाला असला, तरी तो खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. घर लहान असल्यामुळे चूल मांडता येईना. चूल मांडण्यासारखी स्थिती असली तर जाळण्यासाठी लाकडे मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. मोलमजुरी करून संसार चालविणाऱ्यांनी मात्र, सिलिंडर रिकामाच ठेवला असून ते सकाळी लाकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडून आणि पोटाची भूक भागवित आहेत.
————————————————————–
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
जानेवारी २०२१ मध्ये सिलिंडर ६९४ रुपयांना मिळायचा, तर मार्च २०२३ मध्ये हे दर तब्बल १११० रुपयांवर पोहोचले आहेत. मागील महिन्यात १०६१ रुपये होते, त्यात ५० रुपयांची वाढ झाली. घरगुती गॅसचे दर टप्प्याटप्प्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे ग्राहकांना थोडाफार आधार मिळत होता. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत रक्कम डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होत होती. परंतु गेल्या वर्षापासून अनुदान मिळाले नसल्याची स्थिती आहे.
————————————————————
‘केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्यांची चिंता नाही हे यावरून दिसून येते. इंधनावर अधिभार लावून शासन आपले उत्पन्न वाढवू पाहत आहे. पण यामुळे गरिबांच्या खिशाला कात्री लागत आहे. याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. महागाई आवाक्यात न आल्यास पुढील काळात हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था गंभीर होणार आहे’
– सुशीला कांबळे, गृहिणी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta