Share
‘अंकुरम’ शाळेतील अनोखा उपक्रम; चांगल्या सवयींच्या संकल्प
निपाणी (वार्ता) : ‘मी रोज उशिरा उठतो, आई-वडिलांचे ऐकत नाही, नीट जेवण करत नाही, वेळेवर गृहपाठ करत नाही, मला लवकर राग येतो’, अशा अनेक प्रकारच्या दोष आणि वाईट सवयींचा त्याग करत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने होलिका दहन केले. येथील कोडणी रस्त्यावरील ‘अंकुरम’ इंग्लिश मिडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.६) होळी उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन व ते तुम्हाला करायचे आहे, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांशी चर्चा करून स्वतःतील दोष, वाईट विचार, वाईट सवयी कागदावर लिहून आणल्या व त्यांची होळी केली. याशिवाय चांगल्या गोष्टी व चांगल्या सवयींचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
आपल्यामध्ये ही वाईट सवय आहे, याची जाणीव या लहान मुलांना झाली व त्याचा त्याग करण्याचा संकल्प त्यांनी केला, ही अतिशय कौतूकास्पद गोष्ट आहे, असे मत प्राचार्य चेतना चौगुले यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय संस्कृती व परंपरांवर आधारित विविध सण आणि त्यांचे सांस्कृतिक व शास्त्रीय कारणही सांगितले.
नविन वर्षाच्या सुरुवातीला रुवातीला येणाऱ्या गुढी पाडव्याला मांगल्याची, सात्विकतेची गुढी उभारण्यासाठी बाल मनावर संस्कारही करण्यात आले. होळी सणामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन सणाचा आनंद लुटला. यावेळी मारुती महाजन, अर्पिता कुलकर्णी, माधुरी लोळसुरे,नाजनीन शेख, भाग्यश्री शिंदे, निकिता ऐवाळे, ज्योती चवई, स्वाती पठाडे, प्रियांका भाटले, शिल्पा तारळे, असिया शहा, पूजा वसेदार, साधना रोडण्णावर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views:
477
Belgaum Varta Belgaum Varta