आज मूळगावी अंत्यसंस्कार; गावावर शोककळा
निपाणी/(वार्ता) : पंजाब (भटिंडा) येथे लष्करी छावणी परिसरात झालेल्या गोळीबारात बेनाडी (ता. निपाणी) येथील सागर आप्पासाहेब बन्ने (वय 25) हा जवान शहीद झाला. दरम्यान याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शहीद जवान सागर बन्ने याच्यावर आज गुरुवार दि.13 रोजी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.याची प्रशासनाकडून सर्व ती तयारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भटिंडा येथे झालेल्या गोळीबरात कर्नाटक राज्यातील चार जवानांचा समावेश असून, बेळगाव जिल्ह्यातील बेनाडी गावच्या सागर बन्ने या एकमेव जवानाचा त्यामध्ये समावेश आहे.
सागर याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे झाले. त्यानंतर त्याने निपाणी येथील व्ही.एस.एम संस्थेच्या महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. 2018 साली रायचूर येथे झालेल्या सैन्यभरतीत दाखल झाला होता. त्यानंतर त्याने नाशिक येथे वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची पंजाब येथे नियुक्ती झाली होती. त्यानुसार तो भटिंडा येथे कार्यरत होता. दरम्यान बुधवारी पहाटे लष्करी छावणी परिसरात अचानकपणे गोळीबार होऊन हल्ला झाला.
यामध्ये जवान सागर याच्यावर गोळीबार होवुन हल्ला झाल्याने तो शहीद झाला. दरम्यान याची माहिती कुटुंबीय वगळता गावातील नातेवाईकांनी देण्यात आली. शहीद जवान सागर याचे पार्थिव आज गुरुवार दि. 13 रोजी बेळगाव येथे खास विमानाने दाखल झाल्यानंतर त्याला मानवंदना देऊन ते मूळगावी हलविण्यात येणार आहे. दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून पार्थिवाची अंत्ययात्रा काढली जाणार असून बिरदेव माळ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहीद जवान सागर हा अत्यंत हुशार व मनमिळावू व हळव्या स्वभावाचा होता. त्याच्यावर गोळीबार होऊन हल्ला झाल्याने तो शहीद झाल्याचे कळतात गावासह परिसरावर शोककळा पसरली गेली. दरम्यान गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा मेंढी पालनाचा व्यवसाय आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी सागर याला सैन्य सेवेत दाखल केले होते.
——————————————————-
लग्न कार्यास येण्यापूर्वीच काळाचा घाला….
21 मे रोजी सागर याच्या नात्यातील गावामध्ये लग्न सोहळा होता. त्यामुळे या लग्न सोहळ्यासाठी सागर हा दि. 18 ते 20 या दरम्यान सुट्टी घेऊन येणार होता याबाबत सागर याने कुटुंबांना कळविले होते. दरम्यान तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta