Wednesday , December 10 2025
Breaking News

सीमाभागात केळीबागांना तापमानाचा फटका

Spread the love
बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कोगनोळी परिसरातील चित्र
कोगनोळी : गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत आहे. अशा परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
कोगनोळीसह सीमाभागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लग्न समारंभ, वास्तुशांती व इतर धार्मिक कार्यक्रम नसल्याने केळीच्या दरात घट झाली होती.  वर्षात सर्वच कार्यक्रम सुरु झाल्याने केळीला मागणी वाढून दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी होता. परंतू तापमान आणि लोडशेडिंग वाढल्याने केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे.
केळी पिकाला उन्हाळ्यात नेहमीच पाण्याची गरज असते. मात्र ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे केळीला ताण पडत आहे. एकीकडे तापमानाचा फटका तर दुसरीकडे लोडशेडिंग असल्याने केळीला फटका बसत आहे. उष्णतेचा कहर अखेरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तविला आहे. कोगनोळीसह सीमाभागात तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. याचा परिणाम केळी पिकावर होऊ लागला आहे. त्यामुळे केळीचे घड काळे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांचे केळीचे घड कापणीस आले आहेत. त्यांच्या वजनात घट होत आहे. तापमानापासून केळीचा बचाव करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. काही शेतकऱ्यांनी केळीच्या बागेच्या चारीबाजूंनी साड्यांचे कुंपण लावले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी गाजरगवत लावले आहे. तरीही केळीवर तापमानाचा परिणाम जाणवत आहे.
पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ झाली तर केळीसह इतर पिकावर विपरीत परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. तापमानामुळे केळीवर होणारा परिणाम शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून तापमानामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची प्रतिक्रिया येथील केळी उत्पादक आण्णासाहेब सांगरोळे यांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *