
आमदार रोहित पवार : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा
निपाणी (वार्ता) : भ्रष्टाचारांच्या विरोधात क्रांती घडवायचे असेल तर शेवटपर्यंत लढावे लागेल. त्यामध्ये कंटाळा करता कामा नये. गेल्या दहा वर्षात मंत्री पद भोगूनही अनेक कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी आता अंडी घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्तम पाटील यांना निवडून द्या, असे आवाहन महाराष्ट्रातील कर्जत मधील आमदार रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ रोड शो करून येथील म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
रोहित पवार म्हणाले, महिला आणि युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. मंत्र्यांनी मतदारसंघात २२०० कोटी रुपयांची विकासकामे केली असली तरी डोंगरभर भागात पाणीटंचाई का? असा सवाल व्यक्त करून युवकांचा केवळ निवडणुकीपुरताच वापर केला जात आहे. तरीही विरोधक आपल्याकडे येऊन पुन्हा संधी मागणार आहेत. सर्वसामान्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या चुकीला आता माफी नाही. कोरोना, पूर परिस्थितीच्या काळात अनेक अडचणी असताना उत्तम पाटील यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे आता त्यांचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत महिला आणि युवकांच्या समोर विरोधकांचा पैसा फिका पडणार आहे. अन्यायाविरोधात लढा देऊन ४० टक्के कमिशन घेणाऱ्या मंत्र्यांची आता होणारी हॅट्रिक थांबवावी.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी, आतापर्यंत पंचगंगा, कृष्णा, दूध गंगा, वेदगंगा नद्यांचा महापूर पाहिला असून प्रथमच राष्ट्रवादीच्या उत्तम पाटील यांच्या प्रचार सभेलालोक गंगेला महापूर आला आहे. यावरून उत्तम पाटील हे आमदार झाले आहेत. यापूर्वी काकासाहेब पाटील यांना तब्येतीबाबत सल्ला देऊन आपण उत्तम पाटील यांना पाठिंबा देण्याची आवाहन केले होते. त्याला न जुमानता त्यांनी ही निवडणूक लढवली आहे. नागरिकांचे प्रेम, निवडणुकीची तयारी या कसोटीमध्ये उत्तम पाटील हे यशस्वी झाले आहेत. उत्तम पाटील यांनी पुढील काळात सर्वसामान्यांची कामे केल्यास आयुष्यभर विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करतील. या काळात मतदारांना न विसरता सर्वसामान्यांची नाळ जोडून पारदर्शी कारभार केल्यास त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश होईल. त्यासाठी आताचा उत्साह ढळू न देण्याचे आवाहन केले.
उमेदवार उत्तम पाटील यांनी, गेल्या पाच सहा वर्षांपासून प्रत्येक गावातील सर्वसामान्य घटकासह कार्यकर्ते जोडण्याची काम केले आहे. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार यांनी आपल्या कामाची दखल घेऊन बोलून आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे. कार्यकर्ते हीच आपली ताकद आणि पक्ष असून त्यांच्या जीवावरच आपण निवडणूक लढवत आहोत. निपाणीत पिण्यासाठी पाणी नसताना पोहण्याचा तलाव कशासाठी? असा प्रश्न करून अनेक समस्या मतदारसंघात असल्याने त्या सोडवण्यासाठी आपणाला विजयी करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रभारी प्रकाश मोरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाबासाहेब पाटील, मधुकर पाटील, सुनील कांबळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सभेस अभिनंदन पाटील, अशोककुमार असोदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, शेरू बडेघर, शौकत मनेर, दीपक सावंत, सुनील पाटील- भोज, निरंजन पाटील, राजू पाटील, अरुण निकाडे, इम्रान मकानदार, शिरीष कमते यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. बाळा साहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
–————————————————————–
तुफान गर्दीत रोड शो
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील कर्जत येथील आमदार रोहित पवार यांचा रोडशो सायंकाळी पार पडला. त्यामध्ये निपाणी मतदारसंघातील युवक आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रोहित पवार आणि उत्तम पाटील यांनी हात उंचावून मतदारांना संभोधित केले.
Belgaum Varta Belgaum Varta