राजू पोवार; मांगुर, कुन्नूरमध्ये प्रचारसभा
निपाणी(वार्ता) विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाने जनतेचे हित जोपासून राजकारण केले आहे. निपाणी मतदारसंघासह राज्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास उत्तम साधण्यासाठी व कुमार स्वामींचे हात भरपूर करण्यासाठी आपणाला विजयी करा, असे आवाहन धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांनी केले. कुन्नूर मांगुर परिसरात आयोजित धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश पाटील होते.
राजू पोवार म्हणाले, कर्नाटकामध्ये मराठा प्राधिकरण स्थापन करून मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यात आली. भाजप सरकारने मराठा समाजाबरोबरच लिंगायत समाजावरही अन्याय केला आहे. राज्याच्या जडणघडणीत धर्मनिरपेक्ष जनता दलाचा मोठा वाटा आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ही महागाई कमी करण्यासाठी कुमार स्वामी सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या विकासासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या राज्य महिला सचिव सुनिता व्होनकांबळे यांनी, मतदारसंघात मोठ्याप्रमाणात समस्याअसून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांना मताधिक्याने विजयी करा, असे सांगितले. रमेश पाटील यांनी, यापूर्वी कुमार स्वामी सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राजू पोवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी कुन्नूर मांगुर सह परिसरातील कार्यकर्ते व मतदारांनी धर्मनिरपेक्ष जनता दराचे उमेदवार राजू पोवार यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta