युवक बेरोजगार : जगण्याचा प्रश्न गंभीर
कोगनोळी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चे सापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे महामार्ग लगत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील टोल नाक्यावर असणाऱ्या व्यावसायिकांना आपली व्यवसाय बंद करावे लागल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून व्यावसायिक हॉटेल व अन्य दुकाने सुरू करून आपला उदरनिर्वाह करत होते. महामार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने त्यांना व्यवसाय बंद करावा लागला आहे.
शासनाकडून त्यांना मदत देण्यात येणार आहे. पण ही मदत नेमकी उदरनिर्वाहासाठी वापरायची की नवीन व्यवसाय उभा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. व्यावसायिकामुळे अनेक पुरुष स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला होता. येथील व्यवसाय बंद पडल्याने काम करणाऱ्या लोकांना व महिलांना आता कामाला जायचे कुठे असा प्रश्न पडला आहे. वास्तविक पाहता शासनाने उद्योग व्यवसाय वाढवा असे सांगत असताना येथील टोलनाक्यावरील व्यवसाय बंद पडले. व्यवसायिकांचा विचार करून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे व्यावसायिकातून बोलले जात होते.
व्यवसायिकांनी बँक व खाजगी संस्थेचे लाखो रुपयाची कर्जे घेऊन व्यवसाय सुरू केला होता. पण सध्या व्यवसाय बंद झाल्याने येथील शेकडो युवक बेरोजगार झाले आहेत. व्यवसाय बंद पडल्याने लाखो रुपयाची घेतलेले कर्ज कसे फेडायचे व आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न येतील व्यावसायिकांच्या समोर पडला आहे.
येथील व्यावसायिक भाड्याने घेतलेल्या दुकान गाळ्यात आपला व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव करून व सेवा युक्त सुविधा देण्यासाठी चांगल्या पद्धतीचे दुकाने तयार करण्यात आली होती. चढाओढ करून दुकान सजावट करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खर्च केला. सध्या रुंदीकरण होत असल्याने दुकाने व साहित्य काढताना व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू आले. गेल्या दहा-बारा वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यावसायिकांचे अनेक शुभ अशुभ कार्यक्रम झाले. या सर्वांचा साक्षीदार हा टोल नाका झाला होता. आता टोल नाका सोडून जाताना त्यांच्या जीवावर आले आहे. एकंदरीत उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पोटाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिक दुकानदारांचा प्रश्न गंभीर झाला असून याकडे शासनाने लक्ष देऊन त्यांचे पुन्हा व्यवसायासाठी चालना देणे गरजेचे असल्याचे दिसून आले.
Belgaum Varta Belgaum Varta