उत्तम पाटील यांनी घेतली मुंबईत भेट
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात बोरगाव पिकेपीएससी अध्यक्ष उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामध्ये तब्बल ६५ हजारावर मते घेतली. थोडक्यात त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी दिलेली झुंज पाहून मतदारसंघातील प्रत्येक नागरिक कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उत्तम पाटील यांच्यावर खुश असून उत्तम पाटील यांनी यापुढेही लढत राहावे, त्यांना कोणती जबाबदारी द्यायची हे मी पाहून घेतो, अशा शब्दात शरद पवार यांनी उत्तम पाटील यांच्या पाठीवर विश्वासाची थाप मारली आहे. शिवाय बारामतीच्या धर्तीवर निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तम पाटील व अभिनंदन पाटील बंधूनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उत्तम पाटील यांनी निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
शरद पवार म्हणाले, पहिल्याच लढतीत उत्तम पाटील यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यात कॉंग्रेसची लाट असतानाही उत्तम पाटील यांनी घेतलेली दुसऱ्या क्रमांकाची मते महत्त्वाची आहेत. मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी यापुढेही लढत राहावे. त्यांना पदाच्या माध्यमातून कोणाची जबाबदारी द्यायची याचा सविस्तर विचार करून निर्णय घेऊ. उत्तम व अभिनंदन यांनी बारामतीला भेट देऊन तेथील विकासाची पाहणी करावी. बारामतीच्या धर्तीवर निपाणी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करू. पुढील महिन्यात निपाणी दौरा करून तेथील कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानणार आहोत, असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. येथे सविस्तर चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचीही भेट घेऊन पाटील बंधूंनी त्यांना निवडणुकीतील घटनाक्रम सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बळ दिल्याबद्दल आभार मानले. या नेत्यांनीही निपाणी मतदारसंघातील जनतेचे आभार मानत लवकरच निपाणी दौरा करणार असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta