
पर्यावरण प्रेमींनी रोखली वृक्षांची कतल: ५० झाडांचे केले पुनर्रोपण
निपाणी (वार्ता) : येथील बेळगाव नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील ७५ पेक्षा जास्त झाडांची कतल करून लोखंडी विमान बसवण्याच्या प्रक्रियेचा विरोध केला.
पण त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवत प्रशासनाने झाडे तोडली. पण पर्यावरण प्रेमींनी ही झाडे जेसीबीच्या साह्याने मुळासकट उपटून अर्जुनी (ता. कागल) येथील देवराईत पुनर्रोपण केली आहेत. वृक्षतोड रोखण्यासाठी निपाणीकरांनी कोणतीच तसदी न घेतल्याने निपाणीकरांचे ऑक्सिजन अर्जुनीत गेले आहे.
निपाणी नगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी उद्यानातील झाडांची कतल सुरू असताना ती रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. अखेर सृष्टी पर्यावरणवादी संघटना व इतर पर्यावरण प्रेमींनी कंबर कसली. फांद्या तोडलेली सर्व झाडे जेसीबीच्या सहाय्याने मुळासकट उपटून ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे महाराष्ट्र हद्दीतील अर्जुनी या गावातील नरसिंह देवराई या उद्यानात पुनर्रोपण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५० मोठी झाडे देवराईतील उद्यानात खड्डे खणून लावले आहेत. अद्याप २५ झाडे लावणे शिल्लक आहे.
देवराई संस्थेमार्फत सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस, पर्यावरणप्रेमी नामदेव चौगुले, सचिन थोरवत यांच्या अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अर्जुनी ग्रामपंचायतीचे सरपंच वर्षा सुतार, उपसरपंच सुनील देसाई, सुदाम देसाई, दशरथ मिसाळ, सर्व सदस्य, ग्रामसेवक विजय गावडे व कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे शिवाजी उद्यानातील अनेक चांगले वृक्ष जेसीबीच्या साह्याने मुळासकट काढून परत त्याची नृसिंहदेवराई च्या माध्यमातून अर्जुनी हद्दीमध्ये ५×५ चे खड्डे तयार करून खत पाणी टाकून झाडाचे परत प्रत्यारोपण केले आहे. टँकरद्वारे त्या झाडांना विकत पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामपंचायतीने झाडांसाठी १० हजार लिटर पाण्याची टाकी देवराईसाठी बसविली आहे.
————————————————
निपाणीकर गप्पच
येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील वृक्षांची कत्तल होत असल्याची माहिती मिळताच कागल कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोर्चा आंदोलन काढण्यासह निवेदन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र याबाबत निपाणीकर गप्पच असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
——————————————————
‘सृष्टी पर्यावरणावरील संघटनेतर्फे रोपे लावून झाडांमध्ये रूपांतर केले होते. पण त्यांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण होईल की नाही, या शक्यतेमुळे ही झाडे मुळासकट उपटून अर्जुनी मधील देवराई येथे लावली जात आहेत.’
-फिरोज चाऊस, अध्यक्ष, सृष्टी पर्यावरणवादी संघटना निपाणी
———————————————————-
‘छत्रपती शिवाजी उद्यानातील झाडे तोडल्यानंतर अशाच प्रकारचे झाडे शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत नगरपालिकेतर्फे लावली जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी थांबणार आहे.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta