कुपनलिकेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा : दिवसभरात सहा तास पाणी
निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून नदी तलाव विहिरी आणि कुपनलिकेच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे निपाणी भागातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना शेतीवाडीत धावा धाव करावी लागत आहे. अशा या दुष्काळाचे गांभीर लक्षात घेऊन यरनाळ येथे निवृत्ती जवान मयूर लकडे यांनी आपल्या प्लॉटमध्ये खोदलेल्या कुपनिलिकेचे पाणी ग्रामस्थांना देऊन पाण्यासाठी माणुसकी जोपासली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे यरनाळसह निपाणी परिसरात कौतुक होत आहे.
मयूर लकडे हे सैन्य दलातून निवृत्त होऊन यरनाळ या त्यांच्या मूळ गावी परतले आहेत. त्यांनी गावातच पाच गुंठे जमीन घेतली असून दोन वर्षांपूर्वी त्या ठिकाणी कुपनलिका खोदली आहे. त्याला चवदार भरपूर पाणी लागले आहे. त्यामुळे लकडे यांनी तेथे विद्युत मोटार बसवून त्यांनी लावलेल्या चिकू आंबा नारळ सह इतर झाडांना पाणीपुरवठा करीत आहेत. गतवर्षीपर्यंत गावाला उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले होते. पण यावर्षी गेल्या महिन्यापासून पूर्णपणे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी कोकणलिकेला जलवाहिनी जोडून त्यांना चार चाव्या बसविल्या आहेत. त्याद्वारे सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास असे सहा तास पाणी सोडून यरनाळ मधील नागरिकांना दिलासा दिला आहे.
यरनाळ मधील शांतीनगर चा पूर्ण भाग व गावातील अनेक नागरिक हातगाडी व सायकली द्वारे या कुपनिलिकेतून पाणी आणून आपली तहान भागवत आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेला पाणीपुरवठा यंदाचा उन्हाळा संपेपर्यंत नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे यंदा यरनाळकरांची पाणीटंचाई पासून मुक्तता झाली आहे.
—————————————————————
ग्रामस्थातून समाधान
यरनाळ गावाला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या काळात विहिरी, आड व इतर ठिकाणी जाऊन पाणी आणावे लागत होते. पण यावर्षी मयूर लकडे यांनी कुपलीकेचे पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.
—————————————————————–

‘पाणी ही बाब सर्वांना अत्यावश्यक बनली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवते. शिवाय पाणी मिळणे कठीण झाल्याने आपण आपल्या कुपनलिकेचे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच आहे.’
– मयूर लकडे, निवृत्त जवान, यरनाळ
Belgaum Varta Belgaum Varta