उद्या मुक मोर्चा : आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. त्याचा निषेध दक्षिण भारत जैन सभेकडून करण्यात आला असून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सभेकडून करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे रविवारी (ता.९) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, साधू साध्वींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दक्षिण भारत सभेकडून यापूर्वी वेळोवेळी साधूंच्या सुरक्षितेबाबत सरकारला निवेदन ही दिले आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साधूंच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना राबवावी,अशी मागणीही करण्यात आली.
हिरेकुडी गावाच्या नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनि आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येने संपूर्ण जैन समाज दुखी झाला आहे. अहिंसेला प्राधान्य देणारा जैन समाज संपूर्ण मानव जातीला आदर्शवत आहे. अशा पवित्र जैन धर्मांच्या मुनिंच्या हत्या झाल्याने संपूर्ण जैन समाजामध्ये तीव्र आक्रोश आहे. या अत्यंत निंदनीय घटनेचा दक्षिण भारत जैन सभा परिवार तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे. कर्नाटक सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्या करणाऱ्या दोषी आरोपींना कठोर शिक्षा करावी.
जैन मुनिंच्या हत्येमुळे समाजाला मोठा धक्का बसला आहे. कायदा हातात घेणारे कुणीही असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. संशयीताना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आरोपींची सुटका होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रनेने खबरदारी घ्यावी.
बैठकीस सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब जी. पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोरले, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर, कर्नाटकात जैन असोसिएशनचे संचालक उत्तम पाटील, अभयकुमार करोले यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————————-
उद्या मूक मोर्चा
हत्येच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१०) चिकोडी येथील आर. डी. स्कूल जवळ निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील श्रावक श्राविकांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta