
निपाणी तालुक्यात विषारी चार जाती : मारण्याऐवजी सर्पमित्रांना द्या माहिती
निपाणी (वार्ता) : पावसाळी दिवसात बिळात पाणी भरत असल्याने सर्प बाहेर पडतात. अशावेळी सर्प विषारी असो की बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात. यामुळे या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगत विषारी आणि बिनविषारी सर्पांची माहिती घेण्याची गरज निपाणी परिसरातील सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात प्रामुख्याने विषारी सर्पांच्या चार जाती आढळतात. त्यामध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे यांचा समावेश आहे. निमविषारी सर्पात मांजा, हरणटोळ, भारतीय वाळू सर्प, भारतीय अंडी भक्षक साप या जाती आढळून येतात. तसेच बिनविषारी सर्पांच्या जातीमध्ये अजगर, तस्कर, नानेटी, धामण, डुरक्या, घोणस, कुकरी, धूळनागीण, कवड्या, पानदिवड, गवत्या या जातीचाही समावेश आहे.
मार्च ते एप्रिल हे दोन महिने सर्पांचा मिलन काळ असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतात. सर्पांची अंडी उबविण्यासाठी ३० डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची गरज असते. असे तापमान असलेल्या ठिकाणी साप अंडी देतो. यातून ५५ ते ६० दिवसांत म्हणजेच जून-जुलै या महिन्यात पिल्ले बाहेर येण्याचा काळ असतो. या पावसाळी महिन्यात सर्वत्र हिरवळ असते. त्यामुळे बहुतांश साप दिसतात. तालुक्यात विषारी निमविषारी, तसेच बिनविषारी या तिन्ही प्रकारेचे साप आढळून येतात.
——————————————————————–

‘शेतात तसेच रस्त्यांवर सर्प आढळल्यास त्यास कोणती ही इजा न पोहचवता जाऊ द्यावे. घरात सर्प आढळल्यास त्या पासून आठ ते १० फूट अंतर राखून दूर राहावे. सर्प दिसल्यास त्याला स्वतः पकडण्याचे धाडस करू नये. सर्पावर लक्ष ठेऊन सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
-विजय नार्वेकर, सर्पमित्र कुर्ली
——————————————————————
सर्पदंश झाल्यास हे करा
* जखम स्वछ पाण्याने धुवावी.
* कोणताही विलंब न करता त्या व्यक्तीस सरकारी दवाखान्यात न्यावे.
* सर्पाचे विष कोणत्याही मंत्राने उतरत नाही.
* कोणत्याही मंदिरात किंवा बुवा (मांत्रिका) कडे नेऊ नये.
Belgaum Varta Belgaum Varta