ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सहल; लाखो रुपयांचा चुराडा
निपाणी (वार्ता) : वर्षापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये सहलीचे राजकारण करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद पटकावले. त्याची पुनरावृत्ती म्हणून कर्नाटक सीमा भागातील निपाणी तालुक्यात ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सहलीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच अनेक ग्रामपंचायत मध्ये सत्ता असतानाही फेरबदल झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा करून सहलीच्या राजकारणाचे लोन आता सीमाभागातील निपाणी तालुक्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने गेल्या चार दिवसापासून निपाणी तालुक्यात असलेल्या सर्वच ग्रामपंचायत मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी होत आहेत. या निवडीची तारीख जाहीर होताच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी ग्रामपंचायतीमधील सदस्यांना फोडून आपली सत्ता करण्यासाठी आठवड्यापूर्वीच कर्नाटक महाराष्ट्रातील विविध स्थळावर सहलीचे आयोजन केले आहे. आठवडाभर या सदस्यांचा सर्वच खर्च राजकीय नेते मंडळी पाहत आहेत.
निवडीच्या दिवशीच वेळेवर येण्याची तयारी करून तालुक्यातील २७ ग्रामपंचायत मधील सदस्य सहलीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे संबंधित प्रभागात मतदान केलेल्या मतदारांमध्ये मात्र आश्चर्याचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत झालेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडूनमध्ये बहुतांश ठिकाणी सहलीच्या राजकारणाचा उपयोग करून सत्ता स्थापन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहलीच्या राजकारणाची चर्चा निपाणी सीमाभागात रंगली आहे. अशा प्रकारचे सहलीचे राजकारण झाल्यास पुढील काळात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करताना मतदार नक्कीच विचार करतील अशी शक्यता सध्याच्या घडामोडीवरून निर्माण झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारणाचे सहलीचे लोन आता सीमाभागात पसरले असून भविष्यात आणखीन घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——————————————————————
लाखो रुपयांचा चुराडा
अध्यक्ष उपाध्यक्ष निवड ही आता साधी राहिली नसून त्या निवडीसाठी सदस्यांच्या फोडाफोडीसाठी लाखो रुपयांचा चुराडा निपाणी तालुक्यात झाला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीही आता महागल्याचे चित्र दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta