निपाणी शाखेत सेवानिवृत्त, ज्येष्ठ सभासद, यशवंतांचा गौरव
निपाणी (वार्ता) : इतर वित्तीय संस्थांपेक्षा ‘रवळनाथ’ ही वेगळी संस्था आहे. येथील मनुष्यबळ व्यवस्थापन आणि विनम्र व तत्पर सेवेमुळेच संस्थेचा देशात नावलौकीक झाला आहे, असे मत देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले. श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील निपाणी शाखेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित परिसरातील सेवानिवृत्त मान्यवर, पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले ज्येष्ठ सभासद व यशवंत, पाल्यांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रवळनाथाचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले तर प्राणलिंग स्वामी, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राणलिंग स्वामी म्हणाले, आपले पैसे कुठेही जाणार नाहीत, मागता क्षणी नक्कीच परत मिळतील, याची खात्री असल्यामुळेच अनेकांनी आपल्या ठेवी रवळनाथामध्ये ठेवल्या आहेत. ठेवीदारांचा हा विश्वास टिकविण्याबरोबरच समाजासाठी चांगले आणखी कांही करता येईल ते करावे संस्थेने करावे. महादेवी नाईक म्हणाल्या, प्रत्येक माणसाच्या जीवनात घर ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी सहज
व सुलभ अर्थसहाय्य करतानाच रवळनाथाने जपलेली कर्तव्यनिष्ठा, कार्यपध्दती कौतुकास्पद आहे. संस्थापक अध्यक्ष चौगुले म्हणाले, रवळनाथाने अवघ्या २७ वर्षात संस्थेने ४०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून सुमारे ३ हजार घरे उभारण्यासाठी अर्थसहाय्य केले आहे. विविध क्षेत्रातील गुणवंत व अनुभवी मान्यवरांमुळेच रवळनाथाची प्रगती झाली आहे. यावेळी सत्कारमूर्ती प्रा. प्रकाश जी. शहा, सुनिता मिरजे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ सभासद प्रकाश शहा, सेवानिवृत्त सभासद दुंडाप्पा कोरव, प्रा. डॉ. नानासाहेब जामदार, सुनिता मिरजे यांच्यासह श्रावणी गळतगे, साईराज पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
शाखा सल्लागार विरगौडा पाटील यांनी निपाणी शाखेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. निपाणी शाखा सल्लागार मा. प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांनी सुत्रसंचलन केले. रवळनाथाच्या संचालिका रेखा पोतदार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास संचालक महेश मजती, शाखा सल्लागार प्रा. डॉ. शिवाजी होडगे, प्राचार्य डॉ. महावीर कोथळे, सौ. रश्मी व्हदडी, विद्यावती जनवाडे, प्रशांत रामणकट्टी, व्हॅल्युएटर दिपक माने, महेश कदम, तनमन शर्मा शाखाधिकारी उत्तम दळवी, अकाऊंटट के. टी. पाटील यांच्यासह सभासद, हितचिंतक, कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta