नऊ तोळे सोन्यासह 17 हजाराची रोकड लंपास : घराचे कुलूप तोडून चोरी
निपाणी : येथील खोत गल्लीतील रहिवासी आणि सुप्रसिद्ध वकील अॅड. महेश बसवराज दिवाण यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल 9 तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 71 हजार असा एकूण सुमारे 5 लाखांचा ऐवज लंपास केला. तर निपाणी शहरात वाढणार्या चोरीच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शहराच्या मध्यवर्ती महादेव मंदिर भागातील खोत गल्ली येथे अनेक वर्षापासून अॅड. दिवान आपल्या कल्पवृक्ष या तीन मजली बंगल्यात वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता.9) रात्री दिवान हे नेहमीप्रमाणे तळमजल्याच्या पुढील दरवाजाला कुलूप लावून दुसर्या मजल्यावर कुटुंबियांसमवेत झोपावयास गेले.
दरम्यान चोरट्यांनी नेमकी संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास दिवाण यांच्या तळमजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी आतमधील तिजोरी फोडून व देवघरातील गंठण, कर्णफुले दोन जोड असे एकूण 9 तोळ्याचा सोन्याचा ऐवज तर देवार्यातील चांदीची मूर्ती व गळ्यातील ऐवज तसेच रोख रक्कम 18 हजार असा एकूण सुमारे 5 लाखाचा ऐवज व मुद्देमाल लंपास करून पोबारा केला. त्यानंतर तोडलेले कुलूप शेजारच्या बंगल्यातील एका फुलझाडाच्या कुंडीमध्ये टाकले आहेत तर छोट्या पैकी एकाचा टॉवेल चोरी घडीला ठिकाणीच टाकून ते पलायन केले आहेत.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.10) पहाटे सहाच्या सुमारास दिवाण यांची पत्नी तळमजल्याच्या दरवाजा समोर आले असता घराचे कुलूप उघडून दार उघडे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश दिवान यांनी याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी तातडीने मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, हवालदार श्रीशैल मळ्ळी यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी दिवाण यांनी चोरीस गेलेला ऐवज व रकमेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी बेळगाव येथून श्वानासह ठसे तज्ञांना पाचारण केले. दुपारी घटनास्थळी आलेले श्वान परिसरातच घुटमळले.
यावेळी ठसेतज्ञांनी आवश्यक ते ठसे घेतले विशेष म्हणजे भरवस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत अॅड. महेश दिवाण यांनी बसवेश्वर चौक पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी चालविला आहे.