
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दलाल पेठ येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. केशव किरण शिंदे (वय २४ रा. जत्राटवेस, निपाणी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, केशव हा आपल्या वडिलांसोबत हँडग्लोज विक्रीचा व्यवसाय करत होता. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दलाल पेठ येथील भाडोत्री खोलीत त्यांनी गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. वडील किरण हे कामानिमित्त घरी गेले असताना केशव यांने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर वडील घरातून पुन्हा दुकानाकडे परतल्यानंतर दुकानाचे दार बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आत दरवाजा उघडून पाहिल्यानंतर केशव यांने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहीती मिळताच जत्राटवेस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृत केशव याच्या मागे दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta