निपाणी (वार्ता) : येथील दलाल पेठ येथे केशव किरण शिंदे (वय २५) (रा. जत्राट वेस, ढोर गल्ली) या युवकाने भाडोत्री व्यवसायाच्या ठिकाणी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्या प्रकरणी मयत केशव यांचे वडील किरण शिंदे यांनी केशवच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हादाखल केला आहे. यामध्ये अश्विनी प्रभाकर कदम, लक्ष्मी प्रभाकर कदम, प्रभाकर पुंडलिक कदम, गिरीश प्रभाकर कदम, नयन प्रभाकर कदम सर्वजण (रा. जत्राट वेस) निपाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मयत केशवचा अश्विनी कदम यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. मात्र सध्या दोघेही आपल्या आई-वडिलांकडे स्वतंत्ररित्या राहत होते. दरम्यान याबाबत केशव यांच्या पत्नी अश्विनी यांनी गतवर्षी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातकेशव यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान मयत केशवला पत्नी, सासू, सासरा व दोन मेहुणे या पाच जणांकडून त्रास होत होता. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली वावरत होता. या त्रासाला कंटाळून आपला मुलगा केशव याने आत्महत्या केल्याचे वडील किरण शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पुढील तपास सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उमादेवी यांनी चालविला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta