निपाणी परिसरात मूर्ती कारागिरांची तयारी : उत्सवासाठी अवघा महिना शिल्लक
निपाणी (वार्ता) : यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा एक महिन्याचा कालावधी उरला असून निपाणी आणि परिसरातील कारागिरांनी गणेश मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश आहे. सध्या गणेश मूर्ती कारागिरांची गणेशमूर्ती सजविण्यासाठी लगबग सुरू आहे.
यंदा विविध आकारांत गणेशमूर्ती साकारल्या असून बाप्पांच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदींची रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. त्यासाठी रंगकाम करणारे कामगार बारा ते अठरा तास झटत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला सुरू होणार आहे. व २८ ला अनंत चतुदर्शीला विसर्जन होईल. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असल्याने त्याची तयारी देखील गणेश मंडळांकडून सुरू झाली आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीचे बुकिंग करून ठेवले आहे. यंदा गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतअसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तीचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी निपाणी व परिसरातील कुंभार गल्लीतील मूर्तिकार व त्यांचे कुटुंबीय मूर्तीचे रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगारांसह कारखान्यांमध्ये राबत आहेत. येथील नामदेव मंदिरात मूर्तीवर रंगांचा शेवटचा हात फिरवणे, मूर्तीवर मनमोहक रंग चढविणे, गणपतीच्या दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, सजावट करणे अशी शेवटच्या टप्प्यातील कामे सुरु आहेत.
——————————————————————-
यावर्षी पेण येथून आकर्षक कलाकुसरीच्या गणेश मूर्ती साठी उपलब्ध केले आहेत. यंदा रंग, शाडू माती सह विविध कच्च्या मालाच्या किमतीमध्ये व मजूरीत किंचित दरवाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीतही जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढ करावी लागत आहे. सध्या दीड फुटापासून तीन फुटापर्यंत गणेश मूर्ती उपलब्ध आहेत. त्याच्या किमती २७०० रुपयापासून ६ हजार ५१ रुपयापर्यंत आहेत’
– अमरसिंग राजपूत, गणेशमूर्ती विक्रेते, प्रतिभा नगर, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta