Wednesday , December 10 2025
Breaking News

शाळा, विद्यालयांमध्ये फुलणार परसबागा

Spread the love

 

शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक

निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता निपाणी तालुक्यातील शाळा व विद्यालयांमध्ये परसबागा फुलणार असून विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक होणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग निर्माण करण्याचा उपक्रम प्रभावीपणे शाळास्तरावर राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादीचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, पोषक आहार मिळावा, कुपोषण दूर व्हावे, असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यास हा उपक्रम राबविणे कठीण होणार आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळांमध्ये परसबागा निर्माण विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करावयाची आहे. परसबागामधून उत्पादित ताजा भाजीपाला या पदार्थाचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा. परसबागांमध्ये आपत्कालीन सूक्ष्म भाजीपाल्यामध्ये मेथी, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, कांदा, वाटाणा, चवळी, पालक, गहू, इत्यादींची लागवड होणार आहे. हा पौष्टिक भाजीपाला १० ते १५ दिवसात तयार होतो. मायक्रोग्रीन्समध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यांच्यातील पोषक घटक अर्क स्वरूपात असतात. पूर्णपणे वाढलेल्या भाज्यांच्या तुलनेत सूक्ष्म जीवनसत्त्वे, क्षार, अँटी ऑक्सिडंटसची पातळी अधिक असते. प्रत्येक मायक्रोग्रीन मधील पोषक घटकामध्ये फरक असला तरी बहुतेक प्रकारामध्ये पोटॅशिअम, लोह, झिंक, मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक मुबलक प्रमाणात असतात.
——————————————————————-
मुले जाणार शेतात
जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती मिळावी, यासाठी भाजीपाला लागवडीचे उपक्रम राबविले जात आहेत. बहुसंख्य शाळा मुलांना शेतामध्ये सरावासाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे शालेय जीवनात शेतीची आवड निर्माण होत आहे. त्यामुळे आता या पुढील काळात सर्वच विद्यार्थ्यांना शेतात जावे लागणार आहे.
——————————————————————-
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग निर्माण करण्याच्या सूचना वरिष्ठाकडून आले आहेत. त्यामुळे सर्वच शाळांच्या परिसराची पाहणी करून परसबाग निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.’
– महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *