Thursday , March 5 2026
Breaking News

हेस्कॉमवर मोर्चा काढताच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

Spread the love

 

रयत संघटनेचा आक्रमक पवित्रा; तात्काळ नुकसान भरपाईचे आदेश

निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग ७ तास थ्री फेज तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्ट सर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक महंमद रोशन यांच्या समोर रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाअध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हेस्कॉमने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शिवाय रोशन यांनी नुकसान भरपाई देण्यासह ७ तास थ्री फेज शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
मंगळवारी सकाळी (ता.२९) चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ एकत्रित जमून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी विविध घोषणा दिल्या. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये शेतातून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन हजारो एकर ऊस जळत आहे. याशिवाय तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यामुळे अनेक शेतकऱ्यांसह जनावरांचाही मृत्यू झालेला आहे. मात्र संबंधित अधिकारी केवळ पंचनामा करून रिकामे होतात. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. प्रत्येक गावातील विद्युत पुरवठ्याच्या अडचणी बाबत तक्रार बुक ठेवून त्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. आतापर्यंत जळालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी. त्याशिवाय शेतामधील लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या व वाकलेल्या विद्युत खांबांची तात्काळ दुरुस्ती करावी. शेतीवाडीतील उघड्यावरील फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करून त्यापासून होणारा धोका टाळावा. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना नदी, विहीरी आणि कुपनलिकेच्या पाण्यावर पिके जगवावी लागणार आहेत. त्यामुळे शेती वीज पंपासाठी सलग सोळा तास वीजपुरवठा करावा,यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक रोशन यांनी निवेदन स्वीकारून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे चार तास चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी चुन्नाप्पा पुजारी, शिवानंद मुगलीहाळ, मल्लाप्पा अंगडी, आशा एम., सोनू बिराजदार, महेश यादगीर, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, मधुकर पाटील, मारुती पाटील, संजय नाईक, बाबासाहेब पाटील, कुमार पाटील, सागर पाटील, कलगोंडा कोटगे, महेश जनवाडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *