एकाच रात्री पाच मोटारींची चोरी : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
निपाणी (वार्ता) : निपाणीसह जत्राट आणि परिसरातील वेदगंगा गंगा नदीवरील पाण्याच्या मोटरी चोरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी तीन मोटरीची चोरी झाली होती. तर दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घालून नदीवरील पाणी उपसा करणाऱ्या पाच विद्युत मोटारीची चोरी केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नदीकाठावर वारंवार होणाऱ्या चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जत्राट येथील संतोष शिरोळे, दत्तात्रय वडगावे, मनोहर अडीपवाडे, वसंत कल्लोळे, रमेश कल्लोळे या शेतकऱ्यांच्या मोटरीची चोरी झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, पावसाला सुरुवात झाल्यानंतर वेदगंगा नदी काठावरील पाण्याच्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांनी काढून घरात ठेवल्या होत्या. मात्र गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, ऊस, तंबाखू आणि इतर पिकांना पाण्याची गरज भासत आहे. पिके वाळत असल्याने शेतकरी विद्युत मोटारी नदीवर बसविण्यात गडबड करत आहेत. दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी पेट्या जोडून मोटरी नदीवर बसवल्या होत्या. तर काही मोटारी चालू होत्या. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्यावेळी पाच शेतकऱ्यांच्या मोटरी चोरून नेल्या आहेत. एक मोटर बसविण्यासाठी चार ते पाच जण लागतात. तर चोरटे किती असतील याचा अंदाज शेतकरी घेत आहेत. मोटर नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केल्याचे घटनास्थळावरून दिसून येत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली फिरवल्याची घटनास्थळी निर्देशनास येते. एकाच वेळी विद्युत मोटारींची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात भीतीची वातावरण पसरले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलिसांची भेट घेऊन चोरीबाबत तक्रार नोंद केली आहे. या चोरीचा तपास करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta