जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामी; निपाणीत समाजाची बैठक
निपाणी (वार्ता) : राज्यातील लिंगायत समाज आरक्षणाअभावी मागास राहिला आहे. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. शिक्षण, उद्योग, आणि राजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे, यासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी बेळगाव आणि निपाणी भागातील लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवारी (ता.१०) सकाळी १० वाजता येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनामध्ये सभा घेऊन त्यानंतर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इस्टलिंग पूजा करून महामार्ग रोखण्यात येणार आहे. त्यामध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन कुडल संगम येथील जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी केले. गुरुवारी सायंकाळी येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात आयोजित लिंगायत समाज बांधवांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले तर व्यासपीठावर माजी सभापती सुनील पाटील उपस्थित होते.
स्वामीजी म्हणाले, लिंगायत समाजाची लोकसंख्या २ कोटी पेक्षा अधिक आहे. तरीही आरक्षणाभावी सरकार कडून कोणत्याही सवलती मिळत नाहीत.त्यासाठी व्यापक आंदोलन सुरू आहे. २ ए-प्रवर्गामध्ये समावेश होऊन पंचमसाली आरक्षण मिळावे.
याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे मागणी केली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन १० रोजी आंदोलन केले जाणार आहे.यामध्ये निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, गोकाकसह बेळगाव जिल्ह्यातील समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
चंद्रकांत कोठीवाले म्हणाले, समाजाच्या हितासाठी सर्वांनी सर्व भेद भाव, गट तट विसरू स्वामीजींच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन लढा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
माजी मंत्री शशिकांत नाईक यांनीही समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी सभापती सुनील पाटील यांनी, या लढ्यात सर्व समाज बांधव समर्पित पणे काम करुन लढा यशस्वी करतील, असे सांगितले. सिध्दगौडा पाटील यांनीही विचार व्यक्त केले.संजय कमते यांनी आरक्षणाच्या लढ्याविषयी माहिती दिली.
यावेळी बसवराज पाटील,संजय मोळवाडे, रवी गुळगुळे, वज्रकांत सदलगे, अरुण भोसले, रमेश पाटील, मल्लिकार्जुन गडकरी, शिवगोंडा पाटील, रविंद्र चंद्रकुडे, सुधाकर पाटील, शिवाप्पा सवदी, विनायक पाटील, बाबासाहेब चंद्रकुडे, शिवानंद करडे, सुधाकर पाटील, वीरेंद्र खोत, किरण पाटील, जगदीश पाटील, मनोज मलाबादे लिंगायत समाजबांधव उपस्थित होते. बाबासाहेब साजनावर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta