
बाळासाहेब पाटील :९ दिवस विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाच्या शतकातील प्रथमाचार्य १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांचा ६८ वी पुण्यतिथी महोत्सव मिरज येये १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त १० सप्टेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील श्रावक, श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वीरसेवा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट १०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज यांचे पावन पवित्र्य, स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना अभिप्रेत अशा चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे. त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा. त्यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाची माहिती समाजापर्यंत पोहचावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य समारोह रविवारी (ता. १७) होत आहे. यावेळी स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी- संस्थान मठ नांदणी, स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी-संस्थान मठ कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या दिवशी त्यांच्या सल्लेखना समयी सकाळी ६.५५ वाजता शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे. सकाळी १० वाजता अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांतिसद्भावना रॅलीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मंताडाराजा दयानिधी यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीमध्ये वीर सेवा दलाचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, पथनाट्ये, सामाजिक- राष्ट्रीय विषयावर संदेश देणारे देखावे, वाद्यपथकांचा समावेश असणार आहे.
महामहोत्सवाचा मुख्य समारंभ दुपारी १.३० वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात होणार आहे. सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख वक्ते पुणे येथील प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती राहणार आहे
महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, संजयकाका पाटील, राजू शेट्टी, जयंतराव पाटील, प्रकाश आवाडे, आम, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, सुमनताई आर. आर. पाटील, सुधीर गाडगीळ, अभय पाटील, शरद पाटील, अजितराव घोरपडे, संजय पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, दत्ता उर्फ माधव डोर्ले, डॉ. अजित पाटील, संजय शेटे, अरविंद मजलेकर, शशिकांत राजोबा, सुरेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा पुण्यतिथी महामहोत्सव वीर सेवा दल मध्यवर्ती, दिगंबर जैन समाज मिरज, यांच्या वतीने होत असून या पुण्यतिथी महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष मगदूम, सह सेक्रेटरी अभय पाटील, मुख्य संघटक सुनिल पाटील, संयोजक अनंतसागर गोरवाडे, कार्याध्यक्ष सुरेशबापू आवटी, उपाध्यक्ष विवेक उर्फ बंडू शेटे, सुकुमार पाटील, सुभाष पाटील, अविनाश चौगुले उपस्थित होते.
—————————————————————-
विविध स्पर्धा, प्रदर्शनाचे आयोजन
पुण्यतिथी महोत्सव निमित्त १० रोजी आरोग्य शिबीर, १२ रोजी शांतिकलश प्रवर्तन प्रारंभ, १३ते १६ सप्टेंबर पर्यंत शांतिसागर, कर्मवीर व वीराचार्य यांचे प्रदर्शन, १४ रोजी वृक्षारोपण, १५ ते १७ सप्टेंबर कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १५ रोजी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, १६ रोजी पाठशाळा वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा होणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta