शेवटच्या दिवशी जोल्ले समर्थकांचे ५ अर्ज; विरोधी गटाकडून एकही अर्ज नाही
निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना मानणाऱ्या ५ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ३९ झाली आहे. पण विरोधी गटातून एकही अर्ज दाखल न झाल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार आहे. अर्ज माघारीनंतर नवीन संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हालसिद्धनाथ कारखान्याची धुरा खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर बंद अवस्थेकडे चाललेल्या कारखान्याला उर्जितावस्थाच नव्हे तर एक आधुनिक साखर कारखान्यातील मॉडेल बनविण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नाला यश आले आहे.
कारखाना कार्यस्थळावर सभासद, कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या नेतृत्वार विश्वास ठेवला. त्यामुळे कारखान्याची प्रगती झाली. कारखाना प्रगती पथवार येत आहे. कारखान्याचे चित्र बदलले आहे. कारखाना मल्टीस्टेट होवून साखरेबरोबर वीज निर्मीती आणि इथेनॉल निर्मीती करीत कारखाना इतर कारखान्याची स्पर्धा करीत आहे. कारखान्याच्या माध्यमातून या परिसराचा विकास करता येईल असे सांगितले.
विद्यमान चेअरमन चंद्रकात कोठीवाले यांनी सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून कारखाना बिनविरोध करण्यास पाठींबा दिल्याबद्दल आभार मानले. कामगार नेते अनिल शिंदे व अन्य मान्यवरांनी आपले मते व्यक्त करीत कारखान्याच्या प्रगतीत अग्रेसर राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विद्यमान संचालक, नवीन इच्छुक संचालक, भाजपाचे पदाधिकारी, कामगार, सभासद इतर मान्यवर उपस्थित होते. एकूण ३९ अर्ज दाखल झाले असून खासदार जोल्ले व आमदार जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ८ रोजी २० जणांची नूतन संचालक म्हणून निवड होणारे अर्ज ठेवून इतर अर्ज मागे घेण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta