निपाणी : निपाणी ते बोरगाव इचलकरंजी नव्याने केलेला रस्ता पहिल्या पावसाळ्यातच वाहून गेल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. ममदापूर बस स्टॅन्डजवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी मधोमध सिमेंटचा बॅरल लावलेला आहे. अंधारात वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावर लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्याचप्रमाणे बेडकीहाळ नदीजवळ असलेल्या दर्ग्याजवळ मोठेमोठे खड्डे पडलेले आहेत. बोरगाव ते पाचमैल जाणाऱ्या रस्त्यावर बोरगावपासून ऐको इचलकरंजीला जाणारा रस्ता बोरगाव ते हुपरी- रेंदाळ रस्ता या ठिकाणी सुद्धा खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सदलगा मधील सरकारी दवाखान्याजवळ देखील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे चार चाकी व दुचाकी वाहनचालकांना या खड्ड्यातून वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना बऱ्याच वेळेला खड्डा चुकवत असता तोल जाऊन लहान मोठे अपघात घडत आहेत तर कधी कधी वाहने खराब होत आहेत. बोरगाव सर्कलमधील रस्ता देखील पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. एकंदर या रस्त्याची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे ओळखणे कठीण बनले आहे. बोरगाव सर्कल नजीक जैन समाजाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातून बहुसंख्य भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून बरीच वाहने ये-जा करणार आहेत. तत्पूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी निपाणीवासीयातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta