लोकायुक्त डीएसपी जे. रघु. ; निपाणीत लोकायुक्त, पोलिसांची बैठक
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात भ्रष्टाचारासह अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पण अजूनही लोकायुक्त खात्याबाबत म्हणावी तशी माहिती जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना लाच म्हणून रक्कम द्यावी लागत आहे. त्याच्या विरोधात लोकायुक्त अधिकारी कार्यरत आहेत. या पुढील काळात अशा प्रकारच्या समस्या जाग्यावरच सोडविण्यासाठी लोकायुक्त आणि पोलीस प्रशासन कार्यरत राहणार आहे. शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला बळी पडू नका, असे आवाहन बेळगाव येथील लोकायुक्त डीएसपी जे. रघु यांनी दिली. बेळगाव लोकायुक्त विभागातर्फे येथील नगरपालिकेमधील विश्वासराव शिंदे सभागृहात बुधवारी (ता.१३) आयोजित लोकायुक्त आणि पोलिसांच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकायुक्त निरीक्षक अजीज कलादगी यांनी स्वागत करून लोकायुक्त खात्याबाबतची माहिती दिली.
जे. रघु म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी निवारण करण्यासाठी लोकायुक्त आणि पोलिसांची बैठक होणार आहे. यावेळी तक्रारीबाबत लेखी माहिती दिल्यास त्याचे बैठकीतच निराकरण केले जाणार आहे. याशिवाय कायद्याचे ज्ञान आणि प्रबोधन करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, शाळा, महाविद्यालय परिसरात बेकादेशीर तंबाखू, गुटखा विक्री, जमीन बळकावणे, सरकारी कार्यालयातील कामे होण्यासाठी रक्कम मागणी करणे अशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. या बैठकीमध्ये रघु यांच्यासह अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
बैठकीस लोकायुक्त डीएसपी भरत, पीएसआय रवी धर्मट्टी, मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार, महिला व बाल विकास कार्यालयातील जयश्री कौजलगी, विजयलक्ष्मी, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, महसूल निरीक्षक सुनील कांबळे, मनोहर कोले, पाटबंधारे विभागातील अधिकारी ए. एस. पुजारी, पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत उदगट्टी, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, एम. एस. कुलकर्णी, दिपाली लालशिंगे, एस. एस. कुरणे, किरण वासुदेव, शरद सावंत, नागेंद्र बहाद्दुरी, एस. पी. राजकुमार, संजय सूर्यवंशी, पिंटू नुले, व्ही. बी. पाटील यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta