पोलीस उपनिरीक्षक उमादेवी : ‘रवळनाथ’ तर्फे हळदीकुंकू समारंभ
निपाणी (वार्ता) : महिला सक्षम असल्या तरी त्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज आहे. ‘रवळनाथ’ संस्थेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी साथ दिली आहे, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक उमादेवी यांनी व्यक्त केले.श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे येथील शाखेत श्रावण मासानिमित्त आयोजित हळदी- कुंकू समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सीमा गुंजाळ, सविता चौगुले उपस्थित होत्या.
रश्मी व्हदडी यांनी स्वागत केले.
उमादेवी म्हणाल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून महिला आज विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. महिलांनी आपल्या कामात जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास त्या नक्कीच यशस्वी होवू शकतील. भूतकाळातील वाईट घटनांकडे दुर्लक्ष करून रोज नव्याने चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचे आवाहन केले.
शाखा अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी, ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक आणि शाखा सल्लागार यांच्या सहकार्याने निपाणी शाखेच्या यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.सीमा गुंजाळ, ‘रवळनाथ’च्या संचालिका उमा तोरगल्ली यांनीही मनोगत व्यक्त केले. महिलांची ओटी भरुन त्यांना भेट स्वरुपात वाण देण्यात आले.
कार्यक्रमास विमल पाटील, आशाराणी कुलकर्णी, करुणा रामनकट्टी, सुप्रिया चव्हाण, शशिकला कोथळे, विमल खराडे, वृषाली तारळे, सुवर्णा पट्टणशेट्टी, मधु नंदीमठ, विभावरी खांडके यांच्यासह संस्थेच्या महिला सभासद, ठेवीदार महिला उपस्थित होत्या. शाखा सल्लागार व्ही. आर. जनवाडे यांनी सुत्रसंचालन केले. संचालिका रेखा पोतदार यांनी आभार मानले.