
निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.) येथील प्रति तुळजापूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पूर्वाभिमुख अंबिका मंदिरात सूर्योदयापासून वीस मिनिटांपर्यंत किरणोत्सव होत आहे. हा सोहळा वर्षातून दोन वेळा भाविक अनुभवत आहेत. बुधवार (ता.२०) ते शुक्रवार (ता.२२) या तीन दिवसांत हा किरणोत्सव स्पष्टपणे दिसणार आहे. यातील गुरुवारी मुख्य दिवस आहे.
या किरणोत्सव सोहळ्यात सूर्यकिरणांना प्राप्त झालेली हिरण्यवर्णीय सोनकळा आणि या सुवर्ण झळाळीत उजळून निघणाऱ्या या जगदंबेच्या मूर्तीचे दर्शन अविस्मरणीय असते. देवदूतांचा समूहच जणू वेगाने मार्गक्रमण करीत देवीच्या मूर्तीमध्ये विलीन होतो, असा आभास निर्माण करणारे हे हृदयस्पर्शी दृश्य पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होणार आहे. या किरणोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री अंबिका मंदिर ट्रस्ट, ममदापूर व जगन्माता श्री अंबिका या पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेव मधाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta