पी. पी. कांबळे; भारत यात्रा जागृती सभा
निपाणी (वार्ता) : स्थानिक स्वराज्य संस्थांसह सरकारी प्राथमिक शाळांत शासनाने कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या कामावर ताण पडत आहे. याशिवाय शाळे व्यतिरिक्त अनेक कामे त्यांना लावली जात आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची मागणी अनेक वर्षापासून असूनही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शिक्षकांना सर्व कामे करावी लागत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत असल्याचे मत कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटना निपाणी तालुका विभागाचे उपाध्यक्ष पी. पी. कांबळे यांनी व्यक्त केले. येथे नवीन पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन सुरू करावी या पार्श्वभूमीवर ‘आयोजित भारत यात्रा’ जागृती सभेमध्ये ते बोलत होते.
कांबळे म्हणाले, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पडेल ती कामे या शाळांतील शिक्षकांना करावी लागत असल्याने ते लिपिक आणि शिपाईही बनले आहेत. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असून भविष्यात तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशा शाळांत शिक्षकेत्तर कर्मचारी नेमणे गरजेचे आहे.
शाळांत पूर्वी तुकडीला एक याप्रमाणे शिक्षकांची नेमणूक केली जात होती. आता ही नेमणूक विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात केली जाते. अलिकडे खाजगी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढल्याने सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे.त्यामुळे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार शिक्षकांची पदे अतिरिक्त होत आहेत. यामुळे अशा शाळांतील एक किंवा एकापेक्षा अधिक तुकड्यांना शिक्षकच नसल्याचे वास्तव आहे.
एकीकडे शिक्षकांचा तुटवडा तर दुसरीकडे अशैक्षणिक कामे यामुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. शाळा उघडण्यापासून ते शाळा झाडणे, घंटा वाजवणे, स्वच्छता करणे, परसबागेतील फुलझाडांना पाणी देणे, कचरा गोळा करणे, बागेतील तण काढणे, स्वच्छतागृहांचीस्वच्छता करणे, पिण्याचे आ आवश्यक असणारे पाणी तसेच मुख्य गेटला कुलुप लावने अनेक अशी कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासह जुनी पेन्शन योजना लागू करणे गरजेचे आहे.
यावेळी कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सदाशिव वड्डर, जिल्हाध्यक्ष लोकन्नवर, बुडगोळ, पुजारी, सुनील शेवाळे, विनायक गुरव, एम. वाय. गोकार, शिल्पा भुसाणी, मजलट्टी, खाडे, खामकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.