मुस्लिम समाजाचा निर्णय; सामाजिक ऐक्य अबाधित
निपाणी(वार्ता) : यंदा मुस्लिम समाजाचा ईद ए -मिलाद पैगंबर जयंती सण गुरुवारी (ता. २८) आहे. याच दिवशी हिंदू बांधवांचा अनंत चतुर्दशी सण आहे. या काळातील एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या दृष्टीने येथील मुस्लिम समाज बांधवांनी रविवारी (ता. १ ऑक्टोबर) ईद ए -मिलाद साजरी करण्याचा निर्णय असल्याचा निपाणी शहर ईद ए -मिलाद कमिटीने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे हिंदू समाजबांधवातून कौतुक होत आहे.
याबाबत मुस्लिम समाज बांधवांनी दिलेल्या पत्रकातील माहिती अशी, सालाबादप्रमाणे यंदाही ईद ए- मिलाद पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावर्षी गुरुवारी अनंत चतुर्दशी आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर (स्व.स.) यांची जयंती एकाच वेळी असल्याने निपाणी भागातील हिंदू -मुस्लिम समाजातील ऐक्य व सलोखा लक्षात घेऊन पैगंबर जयंती १ ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे. निपाणी शहरात हिंदू मुस्लिम बांधव अनेक वर्षापासून गुण्या- गोविंदाने विविध समारंभ साजरे करीत आहेत. त्यामुळे शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून येते. या ऐक्याला गालबोट न लागण्यासाठी दोन्ही सण वेगवेगळ्या दिवशी साजरे होणार आहेत. त्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांनी या पुढील काळातही अशाच प्रकारे हिंदू -मुस्लिम समाजाची एकी टिकवूनन ठेवून दोन्ही सण आपापल्या परीने साजरे करावेत.
यासाठी मुस्लिम बांधवांनी रविवारी सकाळी ८ वाजता दर्गाह मंडप येथे हजर राहण्याचे आवाहन निपाणी शहर ईद- ए मिलाद कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta