‘श्रीराम सेना हिंदुस्थान’चा पुढाकार; प्रबोधन केल्याने मन परिवर्तन
निपाणी (वार्ता) : दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना पूजन, मिरवणुका झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन होते. पण काही भाविक पाणी कमी असलेल्या तलाव अथवा ओढ्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे ते तात्काळ उघड्यावर पडतात. त्यामुळे त्यांची विटंबना होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी शिरगुप्पीत उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलन करून त्या पुन्हा खोल पाण्यात पुनर्विसर्जन केले. याबाबत कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्याने यंदा उघड्यावर पडणाऱ्या मूर्तींचे प्रमाण कमी झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेश मूर्ती प्रतिष्ठानेनंतर पाचव्या दिवशी शनिवारी (ता. २३) घरगुती गणेश मूर्तींचे सर्वत्र विसर्जन झाले. शिरगुप्पी आणि पांगिरे-बी परिसरातील काही भाविकांनी शिरगुप्पी ओढ्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले होते. ही बाब श्रीरामच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार श्रेयश आंबले, निलेश शेलार, प्रशांत खराडे,
अनिकेत कोळकी, साईनाथ चिकोडे, श्रेयश हातलग्गी, निहाल चराटी, विनायक शेटके, ओंकार बेडगे, विपुल सुतार आणि कार्यकर्त्यांनी उघड्यावरील मूर्ती एकत्र केल्या. त्यानंतर या मुर्त्या शहराबाहेरील अंमलझरी रोडवरील खणीमध्ये विधिपूर्वक पुनर्विसर्जन केले.
गतवर्षी या संघटनेतर्फे शिरगुप्पी ओढ्यातील उघड्यावर पडलेल्या सुमारे १५० पेक्षा अधिक मूर्तींचे संकलन करून त्यांचे पाण्यात पुनर्विसर्जन केले होते. त्यामुळे यावर्षी संघटनेतर्फे कमी पाण्यात मूर्तींचे विसर्जन न करण्याचे आवाहन करून याबाबत जनजागृती केली होती. त्यामुळे यंदा उघड्यावरील मूर्तींचे प्रमाण कमी झाल्याचे श्रेयश आंबले यांनी सांगितले. संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.