निपाणी (वार्ता) : पुढे गणेश विसर्जन मिरवणूक आणि गोंधळ सुरू आहे. त्यामुळे रस्ता बंद असून आपण पोलिस आहोत, असे सांगून वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी असा दोन तळ्याचा ऐवज घेऊन भामट्यांनी पोबारा केला आहे. गुरुवारी (ता.२८) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील टिपको बिल्डिंग परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी विलास फुटाणकर (वय ७० रा.घट्टे गल्ली, निपाणी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, लक्ष्मी फुटाणकर या बऱ्याच वर्षापासून एकट्याच वास्तव्यास आहेत. शहरातील मारुती मंदिर, दत्त मंदिर परिसरात नारळ विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. गुरुवारी बारा वाजता सुमारास त्या आपल्या घरातून प्रभात चित्रमंदिर जवळील टीपको बिल्डिंग परिसरातून बाजारात निघाल्या होत्या. त्याचवेळी रस्त्यावर थांबलेला दोघा भामट्यांनी पुढे गोंधळ सुरू असून आपण पोलीस असून संरक्षणासाठी थांबलो आहोत. तुमचे दागिने लुटण्याची शक्यता असून तात्काळ दागिने देण्याची सूचना केली. शिवाय सुरक्षितपणे बांधून तुमच्या पिशवीत ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानुसार लक्ष्मी फुटाणकर यांनी गळ्यातील दीड तोळ्याची चेन आणि हातातील अर्धा तोळ्याची अंगठी काढून आमच्याकडे दिली. भामट्यांनी वृद्धेचे लक्ष विचलित करून एका कापडात काही खडे बांधून तिच्या हातात दिले. त्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
दरम्यान काही वेळातच फुटाणकर यांनी कापडातील दागिने पाहले असता त्यात खडे असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याबाबतची माहिती जाणून घेतली. सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.