
नागरिकांमध्ये उत्साह; साहित्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ
निपाणी (वार्ता) : शहरात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती शुक्रवारी (ता. १) साजरी होत आहे. ईद-ए मिलादुन्नबीनिमित्त निपाणी बाजारपेठेत सजावट साहित्याची दुकाने थाटली आहेत. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सजावट साहित्याच्या दुकानात गर्दी होत आहे. यंदा साहित्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधव जयंतीपूर्वी घरांची व गल्ली- मोहल्ल्याची सजावट करतात. घरावर रोषणाई, पताका, झेंडे, चमकी अशा विविध वस्तूंची सजावट केली जाते.
येथील अशोकनगर, चाटे मार्केट, जुना पी बी रोड, बेळगाव नाक्यासह विविध भागात १० पेक्षा अधिक ठिकाणी सजावट साहित्याचे स्टॉल लागले आहेत. विविध भागात पताका व झेंड्यांना चांगली मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
शहरात ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त डेकोरेशन, झेंडे यांसह विविध साहित्य विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मुंबई, बरेली, सुरत आदी भागातून सजावटीचे साहित्य येथे विक्रीसाठी आले आहे. पताकांना सर्वाधिक मागणी आहे. ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी प्रत्येक घरात गोड पदार्थ केले जातात. हे पदार्थ शेजारी व नातेवाइकांना वाटप करतात. काही मशिदींमध्ये पहाटे (फजर) च्या नमाजपासून दरुद, नाथ (धार्मिक गीत) म्हटले जाते. तसेच प्रत्येक घरात दुवा पठण (फातीहा) केले जाते. तसेच सरबत, चॉकलेट आदींचे वाटप केले जाते.
——————————————————————-
गरजूंना मदत
ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त शहरातील विविध मंडळ व मोहल्ल्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किटवाटप केले जाते. या वर्षीही किटचे वाटप केले जाणार आहे. त्यात डाळ, तांदूळ, तेल, रवा, साखर आदी वस्तूंचा समावेश असेल. याशिवाय रुग्णालयात फळवाटप, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta