रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
निपाणी (वार्ता) : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने त्याचा ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात सरकार आणि साखर कारखान्यांनी मिळून प्रति टन ५५०० रुपये चा हप्ता द्यावा, अशी मागणी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बेळगाव येथे शुक्रवारी (ता.२९) भेट घेऊन केली.
यंदाच्या हंगामात पाऊसच नसल्याने सोयाबीन, तंबाखू, उसासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा उसाचे उत्पादन घटणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबर पर्यंत कारखाने सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून उसाची तोड सुरू झाल्यास रयत संघटना रस्त्यावर उतरून कारखाने बंद पडल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. याशिवाय सोयाबीन, तंबाखू पिक भाजीपाला नुकसानीचा सर्वे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आले. यासंदर्भात बुधवारी (ता.४ ऑक्टोबर) निजलिंगाप्पा इन्स्टिट्यूट मध्ये सर्वच साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व अध्यक्षांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी दराबाबत चर्चा करण्यासाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. भेटीप्रसंगी प्रकाश नाईक, अश्मा एम., शिवानंद मुगलीहाळ, सुरेश पिगन्नावार, सोमो यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.