निपाणी (वार्ता) : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेतर्फे ३१ वार्डमध्ये स्वच्छता राबविण्यात आली. शहर आणि उपनगरातील काही चौकामध्ये खराटा हातामध्ये घेत सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी – कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
येथील नगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता हीच सेवा या अनुषंगाने ‘एक तारीख एक तास’ ही स्वच्छता मोहीम रविवारी (ता.१) राबविण्यात आली. प्रत्येक प्रभाग स्वच्छ राहिला तर नागरिकांचे आरोग्य ही चांगले राहील. त्याच अनुषंगाने ही मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. रस्त्यावर पडलेला कचरा, नाले साफसफाई यावेळी करण्यात आली. शहरात सुमारे २ टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेमध्ये आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, महसूल निरीक्षक सुनील कांबळे, विनायक जाधव आणि कर्मचाऱ्यांनी आंबा मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम राबवून उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, प्रणव मानवी, माजी सभापती सुनील पाटील आकाश शेट्टी, पिंटू बागडे, एस. के. खज्जनावर, सोनाली उपाध्ये, आशा टवळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.