प्राचार्या डॉ. जे डी. इंगळे ; ‘देवचंद’मध्ये गांधी जयंती
निपाणी (वार्ता) : संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीजींया विचारात आहे. स्वच्छता, राष्ट्रसेवा, आत्मनिर्भरता, समाजाविषयी असणारी तळमळ, याबद्दल त्यांचे विचार युवकांना सतत प्रेरणा देतात. युवकांनी गांधीजींचे विचार जीवनामध्ये आचरणात आणल्यास निकोप समाज व राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल, असे मत देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जे डी. इंगळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागातर्फेआयोजित महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्राचार्य इंगळे म्हणाल्या, महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. समाजसेवा, राष्ट्रसेवा व दिनदलितांची सेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे असे त्यांचे मत होते. अध्यात्मिक क्षेत्रात ही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. महात्मा गांधीजी यांच्या विचाराचे अनुकरण केल्यास समाजातील जातीभेद, धर्मांधता, दहशतवाद, वंश श्रेष्ठत्ववाद नष्ट होईल एवढे वैचारिक सामर्थ्य महात्मा गांधीजी यांच्या जीवनात आहेत.
उपप्राचार्य ए. डी. पवार यांनी, विकसित होण्यासाठी महात्मा गांधीजी यांचे विचार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच जी-२० देशातील विकसित देश ही राजघाटावर नतमस्तक होत असल्याचे सांगितले. पर्यवेक्षिका एस. पी. जाधव यांनी, महात्मा गांधींच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. श्रावणी लोहार, सानिका पट्टेकरी, देवकी घोळवी, प्रल्हाद पाटील, दिपाली चिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल घटेकरी यांनी प्रास्ताविक केले. प्रिया हजारे हिने सूत्रसंचालन केले. प्राजक्ता घटेकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास बी. एस. कुंभार, ए. ए कुराडे, आर. एस. सोकासने, राहुल वंदुरे उपस्थित होते.