कुर्ली परिसराला पुराचा धोका : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यमगर्णी जवळील वेदगंगा नदीवर पूल मंगुर फाट्यावर नवीन उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. पुलासह दोन्ही बाजूला कच्चा मुरूम टाकला जात आहे. येथे पूल बांधल्यास पावसाळ्यात कुर्लीसह परिसरातील गावांना पुराच्या पाण्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे कच्च्या मातीने होणारे पुलाचे बांधकाम थांबवून पुलाचे खांब व स्तंभ टाकून बांधकाम करण्यात यावे, तसे न झाल्यास परिसरातील ग्रामस्थातर्फे तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा कर्ली आणि परिसरातील नागरिकांनी दिला. याबाबत ग्रामस्थातर्फे अरुण निकाडे, श्रीनिवास पाटील, ॲड. अमर शिंत्रे व मान्यवरांच्या हस्ते सोमवारी (ता.९) तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील तील माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वरील मांगरफाटा येथे सहा पदरी कामामध्ये ओव्हर ब्रिज बांधले जात आहे. त्यामुळे कुर्लीसह भाटनांगनुर, म्हाकवे, आनूर, बाणगे, मळगे, सुरुपली, बस्तवडे, कौलगे, चिखली, बुदिहाळ, यमगर्णी व सौंदलगा गावामधील शेती, ग्रामस्थ व जनावरांना पावसाळ्यातील येणाऱ्या पाण्यामुळे त्रास होणार आहे.
नुकसान होणार आहे. शिवाय कुर्ली या गावामध्ये ९० टक्के महापुराचे पाणी शिरणार आहे. कुर्ली बस स्थानक भागात चार फूट पाणी राहणार आहे. यापूर्वी २०१९ व २०२१ सालीही पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. आता नवीन पूल झाला तर त्याच्या पाठीमागे असणाऱ्या गावातील नागरिकांचा संसार पावसाळ्यामध्ये उघड्यावर पडणार आहे. याशिवाय शेती, जनावरांची वैरण व जनावरांची हानी होणार आहे. तरी सदर कामाची रुपरेषा व येणाऱ्या महापुराचे नियोजन सरकार कशाप्रकारे करणार आहे. त्याची माहिती द्यावी.
तहसीलदार बळीगार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्याचे आवाहन केले. या निवेदनाच्या प्रती निपाणी पोलीस ठाणे, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, उत्तम पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हुबळी विभागातील व्यवस्थापकांना पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी कुमार माळी, विश्वनाथ पाटील, लक्ष्मीकांत पाटील, ॲड. दादासाहेब लंबे, लक्ष्मण नेजे, नानासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, सुधाकर व्हराटे, रामचंद्र कवाळे, राजेंद्र कोष्टी, महेश पाटील यांच्यासह कुर्ली, यमगर्णी बुदिहाळ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.