अध्यक्ष बाळासाहेब सरकार : २७ रोजी मुख्य दिवस
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या काळात साजरा होणार आहे.त्याची तयारी सुरू असल्याची माहीती उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार यानी दिली. येथील चव्हाणवाड्यात आयोजित ऊरुष कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
बाळासाहेब सरकार म्हणाले, सोमवारी (ता.१६) पासून चव्हाणवाडा व दर्गा देवस्थान येथे ताशा, सनई वादनास सुरुवात होणार आहे. सोमवारी (ता.२३) चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढविला जाणार आहे. बुधवारी (ता. २५) चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढविला जाणार आहे.
गुरूवारी (ता.२६) गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे.
शुक्रवारी (ता.२७) भर उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२८ ) खारीक च उदीचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.२९) मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना, मंगळवारी (ता.३१) पाकाळणी कार्यक्रम व गोडा नैवेद्य दाखवला जाणार आहे. उरूस काळात आतषबाजी होणार आहे. उसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून यामध्ये ओपन गावगन्ना बैलगाडी, घोडा बैलगाडी, गाडी मागून श्वान पळवणे, घोडागाडी शर्यती, कुस्त्यांचे मैदान, कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. बैठकीत दर्गाहचे मुजावर शकील मुजावर, अहमदअली मुजावर यांचा सत्कार झाला. यावेळी नगरपालिकेतर्फे स्वच्छता, पाणी व इतर सोय केली जाणार आहे. तर ऊरुस काळात वीजपुरवठा निरंतरपणे करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार असून पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पृथ्वीराज देसाई -सरकार रणजीत देसाई -सरकार, संग्राम देसाई – सरकार, राजूबाबा निपाणकर, विवेक मोकाशी, बाळासाहेब पोतदार, पाटील, जयराम मिरजकर, संभाजी मुगळे, शरद मळगे, दिलीप रावळ, प्रदीप रावळ, निलेश पावले, विश्वास माळी, संजय माने, अतिश सुतार, बंडोपंत गंथडे, सुजित गायकवाड, शितल बुडके, पितांबर कांबळे यांच्यासह उरूस कमिटी सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.