
महेश जाधव ; देवचंदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
निपाणी (वार्ता) : भारतात अद्यापही ८० टक्के लोकांना विम्याचे महत्त्व माहीत नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्या नंतर लोकांना विमा या प्रकाराबद्दल जाग येते. कोविड हा रोग येण्यापूर्वी जी मानसिकता लोकांमध्ये विम्याबद्दल होती ती कोविड काळात किंवा तदनंतर पूर्णपणे बदललेली दिसते. याचे कारण या कोवीडने विम्याचे महत्त्व पटवून दिले. स्टेट बँक ऑफ इंडिया या अग्रगण्य बँकेत विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या भरपूर संधी असल्याचे मत बँकेचे विमा विकास व्यवस्थापक महेश जाधव यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयामध्ये आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
महेश जाधव म्हणाले, स्टेट बँक ऑफ इंडिया ही विमा क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे. अशा संस्थेत विमा अधिकारी म्हणून काम करण्यात युवकांना भरपूर संधी आहेत. या क्षेत्रामध्ये नोकरी म्हणून पाहिल्यास थोड्याच वर्षात मोठ्याअधिकाराच्या पदापर्यंत पोहोचू शकतो. व्यावसायिक म्हणून यात प्रवेश केल्यास भरपूर व्यवसाय करता येतो. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येऊन आपले करिअर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमात बँकेच्या विमा क्षेत्राची तांत्रिक माहिती बँकेचे विमा क्षेत्राचे विकास अधिकारी अभिजीत पोळ यांनी दिली. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रवींद्र दिवाकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष अर्जुनवाडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस. जी. मुळीक, प्रा. संतोष होडगे, प्रा. राहुल बोटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे व सिद्धार्थ बेडर यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta