
निपाणीत भव्य मंडपासह विद्युत रोषणाई ; उद्यापासून सोहळ्यास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात नवरात्रो त्सवा निमित्त विविध मंडळातर्फे आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. त्यानिमित्त गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली कामे पूर्ण झाली असून अनेक मंडळांनी भव्य दिव्य असे मंडप उभारले आहेत. रविवारपासून (ता.१४) या सोहळ्याला प्रारंभ होणार असून येथील कामगार चौकातील नवरात्र उत्सव मंडळाने ५० व्या वर्षानिमित्त भव्य असा मंडप उभारला असून शहरातील नवरात्र उत्सवाचे ते आकर्षण ठरले आहे.

निपाणी शहर आणि ग्रामीण भागात ८५ नवरात्र उत्सव मंडळातर्फे यंदा दुर्गा मातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर शहरापासून जवळच असलेल्या रामपूर येथे केवळ एकाच ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथील प्रगती नगरातील शुभ कार्य मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दक्षिणाभिमुख दुर्गा मातेची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या मंडळातर्फे ही विविध धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय शिवाजीनगर, नरवीर तानाजी चौक, अशोक नगर आणि उपनगरातही नवरात्र उत्सवानिमित्त विविध मंडळातर्फे आणि कार्यक्रम होणार आहेत.
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त येथील बाजारपेठेत सजावट साहित्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी दांडिया खेळांचे सराव केले जात आहेत. एकंदरीत शहर आणि परिसरात नवरात्र उत्सवासाठी नागरिक साजरी झाले असून रविवारी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
——————————————————————
मंदिरात उपवासाची प्रथा
शहरासह ग्रामीण भागातील मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त अनेक जण उपवास करून तिथेच मुक्काम करणार आहेत. शिवाय सकाळ सायंकाळ आरतींचेही आयोजन केले आहे. यरनाळ येथील अंबिका मंदिरात आरतीसाठी संपूर्ण गाव एकत्र येण्याची प्रथा कायम टिकून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta