
मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार; खुनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी मुलांचे भवितव्य अंधकारमय बनत चालले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. याशिवाय नागरिकांनीही आपल्या मुलांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे मत मंडळ पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी येथील बाळूमामा नगरात किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याचा खून झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करताना ते बोलत होते.
बी. एस. तळवार म्हणाले, शाळा, महाविद्यालयांव्यतिरिक्त आपला मुलगा किंवा मुलगी कोठे जातात? काय करतात? कोणाच्या संपर्कात असतात? याची माहिती ठेवून चुकीचे वर्तन दिसल्यास तात्काळ त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत.
साकीब पठाण या १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ ते दहा संशयितांची चौकशी केली होती. त्यापैकी दोघांनी खुनाची कबुली दिली. मात्र भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी चौकशीसाठी मुलांना ताब्यात घेतले आहे. दिवसभर कामानिमित पालक बराच वेळ घराबाहेर असतात.
आपली मुले मोबाईल अथवा टीव्हीवर काय पाहतात, याकडेही पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुलांच्यावर त्योग्य संस्कार करावेत.
वाढत्या व्यसनाधीनतेतूनही गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांचे वेळोवेळी समुपदेशन करावे, आपल्या मुलांच्या मनावर विपरित परिणाम करणाऱ्या चुकीच्या गोष्टी दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधल्यास त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही तळवार यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta